कोल्हापूर : आजरा तालुक्यात लाटगाव येथील सूर्यकांत सरदेसाई यांच्या उसाच्या फडात टस्कर घुसल्याने ऊस तोडणी कामगारांची चांगलीच धावपळ उडाली. टस्करच्या भीतीने ऊसतोडणी थांबवण्यात आली. याची माहिती वन विभागाच्या पथकाला कळविण्यात आली. वनपाल संदीप शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी टस्करला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. टस्करच्या भीतीने ऊसतोडणी बंद करण्यात आली असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे.
लाटगावपासून एक किलोमीटर अंतरावर सूर्यकांत सरदेसाई यांची बांधवाट परिसरात ऊस शेती आहे. शेतामधील उसाची तोडणी आज सुरू होती. सायंकाळी अचानक उसाच्या फडातून जोराचा आवाज येऊ लागला. टस्कराच्या चित्काराने परिसर हादरून गेला. ऊसतोडणी करीत असलेल्या मजुरांना याची कल्पना नव्हती. चित्कारामुळे ते गर्भगळीत झाले. ‘हत्ती आला ‘ म्हणत ते सैरावैरा पळू लागले. यावेळी तेथे आलेल्या समीर देसाई यांनी हत्ती शेतात घुसल्याचे पाहून वन विभागाला माहिती दिली. दरम्यान, वन विभागाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी टस्कराला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. हत्तीच्या भीतीने येथील ऊस तोडणी थांबविण्यात आली आहे.
















