सोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा साखर कारखान्याच्या वजन काट्याची अचानक तपासणी करीत एकच वाहन तीन काट्यावर फिरवून वजन केले. त्यामध्ये काहीही फरक आढळून आला नाही. यानंतर काट्यावर २० किलोची प्रमाणित वजने ठेऊन प्रत्यक्ष वजन केल्यानंतर वजनात कोणताही फरक आढळून आला नाही. यावेळी निरिक्षण वैधमापन शाखा, पुण्याचे डी. के. शेजवळ, उपनियंत्रक निरीक्षक उदमिले, शेतकरी प्रतिनिधी, अध्यक्ष महाडिक, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे व खाते प्रमुख उपस्थित होते. सभासदांचा शेतकऱ्यांचा विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देता, आजच्या वजनकाटा तपासणीने विश्वासार्हता आणखी वाढली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी दिली.
याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांनी सांगितले की, भीमा कारखान्याचा वजनकाटा चोख आहे. हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास आजच्या पुणे विभागाच्या काटा तपासणीने पुन्हा एकदा द्विगुणित झाला आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. भीमा कारखान्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये चोख काटा असणारा कारखाना म्हणून नावलौकीक मिळविला आहे. राज्यात काट्याबद्दल अनागोंदीच चित्र असताना राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखालील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याबद्दल गत दहा वर्षांत एकाही सभासदाची तक्रार आलेली नाही.

















