कोल्हापूर : नोव्हेंबरच्या उत्तरार्धात देशातील साखर हंगामाने वेग घेतला असून आतापर्यंत ४१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्राने साखर उत्पादनात आघाडी घेत १७ लाख टन साखर तयार केली आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल उत्तर प्रदेशात १४ लाख टन तर कर्नाटकात ८ लाख टन साखर तयार झाली आहे. यंदा महाराष्ट्रात आतापर्यंत २१३ तर उत्तर प्रदेशमध्ये १५१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. महाराष्ट्रात तब्बल १७० साखर कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली. उत्तर प्रदेशात ११६ तर कर्नाटकात ७५ कारखाने सुरू झाले आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, या स्थितीत चालू हंगामाच्या अखेरीस (सप्टेंबर २०२६) देशात ३५० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
गेल्यावर्षी महाराष्ट्रात साखर कारखाने उशिरा सुरू झाल्याने नोव्हेंबर अखेरच्या कालावधीत केवळ ४ लाख टन साखर तयार झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जलद गतीने साखर निर्मिती होत आहे. गेल्या वर्षी या कालावधीत देशात २८ लाख टन साखर तयार झाली होती. गेल्यावर्षी या कालावधीपर्यंत ३३४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा ४८० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सुमारे ३५ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी वळविल्यानंतर साखरेचे निव्वळ उत्पादन ३१५ लाख टन अपेक्षित आहे. त्यात साखर उत्पादनात अव्वल असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र ११० लाख टन, उत्तर प्रदेश १०५ लाख टन, कर्नाटक ५५ लाख टन आणि गुजरात ८ लाख टन इतके निव्वळ साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. दरम्यान, आणखी दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केली आहे. परंतु जागतिक बाजारात भारतीय साखरेचे मर्यादित प्रमाण पाहता सध्याच्या आंतरराष्ट्रीय साखरेच्या किमतींवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, असे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.


















