परभणी : ट्वेंटीवन शुगरसमोर शेतकऱ्यांचे ऊसदरप्रश्नी ठिय्या आंदोलन सुरूच

परभणी : मांजरा ग्रुपने लातूर जिल्ह्यात उसाला पहिली उचल प्रति टन ३१५१ रुपये जाहीर केली आहे. परंतु या ग्रुपच्या सायखेडा (ता. सोनपेठ) येथील ट्वेंटीवन साखर कारखान्याने अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी समितीतर्फे सोमवारपासून कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. गाळप सुरू असलेल्या उसाला यंदा पहिली उचल प्रति टन ३,००० रुपये द्यावी, एकूण ४,००० रुपये दर जाहीर करावा या मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी समितीच्यावतीने सोमवारपासून हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. तोडगा न निघाल्यामुळे मंगळवारी (ता. २) दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. ऊसदर प्रश्नी चर्चा करण्याऐवजी कारखाना प्रशासनाकडून हे आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

दरम्यान, आंदोलनामुळे ऊसतोड बंद झाली असून या कारखान्याचे ऊस गाळप बंद झाले आहे. उसाला रास्त दर जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकरी समितीने केला आहे. मंगळवारी (ता. २) ट्वेन्टीवन साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात मधुकर महाराज बारूळकर यांचे कीर्तन झाले. या आंदोलन ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कारखान्याने लवकरात लवकर सकारात्मक भूमिका घेऊन दराबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करावी अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here