आधुनिक पूर्वहंगामी ऊस लागवडीतून जास्त उत्पादन शक्य : तज्ज्ञांचे मत

कोल्हापूर : ऊस लागवड करताना शास्रशुद्ध बेणे, योग्य सऱ्या, सेंद्रिय खत, सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि आंतर मशागत या सर्व गोष्टी एकत्र करणे हीच आधुनिक ऊस लागवड आहे. त्यामुळे उसांची एकरी संख्या, जाडी, साखर उतारा आणि लक्षणीय नफा वाढतो, असा कृषीतज्ज्ञांचा सल्ला आहे. खोल नांगरट, सबसॉयलरचा वापर आणि सेंद्रीय खत दिल्यास जमीन भुसभुशीत होते. त्यामुळे ऊस पिकाची मुळे जमिनीत खोलवर जातात. पाणी चांगला निचरा होतो आणि ऊस जोमाने वाढतो. शेतकऱ्यांनी ऊस पिकाचे चांगले उत्पादन येण्यासाठी सऱ्यांचे योग्य नियोजन गरजेचे आहे. सऱ्या २० ते २५ सेमी खोलीच्या आणि दिशेला दक्षिणोत्तर कराव्यात. हलक्या जमिनीत साडेचार फूट आणि भारी जमिनीत ५ फूट अंतर ठेवावे.

ऊस लागवडीवेळी बाविस्टीन व इमिडाक्लोप्रिड द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवावे. नंतर जैविक द्रावणात ३० मिनिटे ठेवल्यास उगवण सुधारते. जड, क्षारपड जमिनीत कोरडी लागवड करावी. हलक्या जमिनीत ओली लागवड करावी. जमिनीनुसार, पद्धत बदलल्यास उसावर ताण कमी येतो. उसामध्ये पहिल्या सहा महिन्यात तण नियंत्रित करावे आणि नांग्या बाळभरणी करावी. त्यामुळे उसाचे फुटवे वाढतात आणि उसाची वाढ जोमदार होते. उसाला सरळ, मिश्र आणि संयुक्त खते द्यावीत. यातून ऊस जाड, मजबूत आणि साखर उतारा जास्त मिळतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here