सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात पुरवठा झालेल्या उसाची प्रतिटन ३५०० रुपयांप्रमाणे होणारी बिलाची एकूण ७० कोटी ५४ लाखांची रक्कम शेतकरी सभासदांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केली. त्यामुळे शेतकऱ्यांना चालू हंगामाच्या सुरुवातीलाच आवश्यक आर्थिक आधार मिळाला आहे. कारखान्याने यंदा, २०२५-२६ या गाळप हंगामात जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा ३५०० रुपयांचा दर जाहीर करत ऊस दराची कोंडी फोडली होती. आता कारखान्याने जिल्ह्यात सर्व प्रथम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा करत आघाडी घेतली आहे.
कृष्णा कारखान्याने पारदर्शी कामकाज, आर्थिक शिस्त आणि शेतकरी केंद्रित निर्णयामुळे गावोगावी सभासद शेतकऱ्यांत विश्वासाचे मजबूत नाते निर्माण केले आहे. यंदा ऊसदराची कोंडी फोडत, तसेच सर्वप्रथम बिलवाटप करून कारखान्याने शेतकरी हिताची परंपरा अधिक दृढ केली आहे, असे मत सभासद शेतकऱ्यांतून व्यक्त केले जात आहे. कारखान्याने नेहमीच शेतकरी सभासदांचे हित जपत पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिले आहे. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी ऊस उत्पादकांना न्याय आणि स्पर्धात्मक दर देत आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. या दरामुळे सभासद शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात होते.


















