पुणे : जिल्ह्यातील ऊस गाळपात बारामती अ‍ॅग्रो आघाडीवर, ओलांडला साडेसहा लाख टनाचा टप्पा

पुणे : जिल्ह्यातील ऊस गाळपात बारामती अ‍ॅग्रोने तर साखर उताऱ्यात माळेगाव साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. सद्यस्थितीत बारामती अ‍ॅग्रो व दौंड शुगर या खाजगी कारखान्यांनी पाच लाख गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील बारामती अ‍ॅग्रोने ६ लाख ५८ हजार मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ७२ हजार क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे. त्या खालोखाल दौंड शुगरने ५ लाख ४० हजार मे. टन उसाचे गाळप करून ३ लाख ८३ हजार पोत्याचे उत्पादन घेतले आहे तर २ लाख ७२ हजार मे. टन उसाचे गाळप करून २ लाख ७८ हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेत सोमेश्वर कारखाना तिसऱ्या क्रमांकावर आहे. सद्यस्थितीत सहकारी कारखान्यांच्या भोवती असणाऱ्या सर्वच खासगी कारखान्यांनी स्वतःची गाळप क्षमता वाढवली आहे. हे कारखाने जादा ऊसदराचे आमिष दाखवत कारखाने एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळवतानाचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आजअखेर सरासरी सव्वाआठचा साखर उतरा ठेवत २९ लाख ३३ हजार ७२० टन ऊस गाळप करत २४ लाख २१ हजार ४२० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे.ऊस गाळपास खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे, तर साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांनी बाजी मारली आहे. १०. ४५ टक्केचा साखर उतारा ठेवत माळेगाव कारखाना आघाडीवर असून त्या खालोखाल १०.३९ टक्केचा साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखाना तर १०.२६ चा साखर उतारा ठेवत छत्रपती कारखाना तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी हा ‘हाय रिकव्हरी पिरेड’ म्हणून ओळखला जातो. या कालावधीत उसाचे वजन वाढून शेतकऱ्यांना फायदा होतो. दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याने उशिरा तुटणाऱ्या उसाला अनुदान जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here