सातारा : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊस गाळपावेळी काटामारी होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, शासकीय यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. साखर कारखान्यावरील ऊस वजन काट्यांची तपासणी सरकारी यंत्रणा कधी करणार, असा सवाल बळीराजा शेतकरी संघटनेने केला आहे. याबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी निवेदन दिले आहे. साखर कारखान्यांमध्ये रोज उसाने भरलेल्या शेकडो गाड्या, ट्रॅक्टर वाहतूक करतात. पण कारखान्यावर जाणारा ऊस वजन काट्यात किती आणि प्रत्यक्षात किती याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत किती साखर कारखान्यांचे वजन काटे दोषी आढळले आहेत. किती साखर कारखान्यांवर कारवाई झाली आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे निराशाजनक मिळत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
पंजाबराव पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहायता निधीला साखर कारखान्यांना प्रति टन दहा रुपये व पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रति टन पाच रुपये कपात करण्याचा आदेश काढलेला होता. या आदेशाला साखर कारखान्यांनी विरोध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्यावर दबाव आणण्यासाठी साखर कारखाने उसाच्या वजनात काटामारी करत असल्याचे वक्तव्य केले होते. मग कारखान्यांवरील वजन काट्यांची तपासणी का होत नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा करून दाखवावा. कारवाई केली तरच उसाच्या वजन काट्यात काटामारी होणार नाही व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.


















