कोल्हापूर : येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना चालू हंगामात गळितास येणाऱ्या उसास एकूण प्रतिटन ३५०० रुपये ऊसदर देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली. कारखाना पहिल्या उचलीपोटी प्रतिटन ३४५० रुपये देणार असून, ५० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता अदा करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. ते म्हणाले, ‘कारखान्याने चालू गळीत हंगामात २ डिसेंबरअखेर एक लाख २८ हजार ३२० टन उसाचे गाळप करुन एक लाख ७ हजार ८०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे.
कारखान्याने हंगाम सुरुवातीपासून ते १५ नोव्हेंबरअखेर कारखान्याकडे गळितास आलेल्या ४८ हजार २७८ टन उसाच्या बिलापोटी प्रतिटन ३४०० रुपयांप्रमाणे १६ कोटी ४१ लाख ४६ हजार एवढी रक्कम सोमवारी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. उर्वरित प्रतिटन ५० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम २४ लाख १४ हजार आज वर्ग केली आहे.’ कारखान्याने एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. चालू वर्षी कारखान्याचे पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून, गळीत हंगाम २०२५-२६ साठी शेतक-यांनी पिकविलेला ऊस गळितास पाठवून कारखान्याने ठरवलेले गाळप उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सचिव नंदू पाटील आदी उपस्थित होते.

















