कोल्हापूर : स्थलांतरित ऊसतोडणी, वीटभट्टी मजुरांच्या मुलांना शाळेत दाखल करणे, यासाठी उमेद फाउंडेशनतर्फे बालहक्क कार्यशाळा झाली. शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश आंग्रे म्हणाले, ‘उमेद’ गेली १० वर्षे स्थलांतरित मुलांना शिक्षण प्रवाहात आणायचे कार्य करत आहे. वीटभट्टी, ऊस तोडणीनिमित्ताने मजूर स्थलांतर होऊन परजिल्ह्यांतून जिल्ह्यात आले आहेत. कोपार्डे, कुडित्रे, माजनाळ, आसुर्ले पोर्ले, अशा तीन डे-केअर सेंटरमार्फत सध्या ३ ते १४ वर्षे वयोगटांतील ७५ मुले उमेद फाउंडेशनमार्फत नजीकच्या शाळेत दाखल केले आहेत. उमेद डे-केअर सेंटरचा लाभ घेत असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी दिली.
यावेळी गाताडे म्हणाले, स्थलांतरित बालकांच्या शिक्षण प्रवाहात दाखल करणे, टिकवणे, या उद्देशाने प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, शाळा समिती अध्यक्ष, पालक, अशा ५० हून अधिक मान्यवरांच्या उपस्थितीत बालहक्काबाबत असलेले कायदे, नियम, विविध शासकीय विभागांचे कर्तव्य, अधिकार उपाय यावर चर्चा करून या कार्यशाळेत कृती आराखडा तयार केला आहे. यावेळी बी.बी. पाटील, मनीषा जाधव, सुक्रांती भागवत, उर्मिला पाटील, तातोबा डांगे, शिवाजी पोवार, ज्योतिराम झेंडे आदी उपस्थित होते.


















