परभणी : ५ डिसेंबर जागतिक मृदा दिनाचे औचीत्य साधुन मृदेतील जैवविविधता रक्षणाकरिता ऊसाचे पाचट जाळू नये यासाठी पाचटाचे व्यवस्थापन कसे करावे याची शास्त्रोक्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने ट्वेंटीवन शुगर्सचे अध्यक्ष, आमदार अमित देशमुख, उपाध्यक्ष विजय देशमुख, कार्यकारी संचालक सुभाष पाटील, मुख्य शेतकी अधिकारी तुकाराम गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये जमीन आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण व शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
येळकर यांनी जागतिक मृदा दिनाचे महत्त्व सांगतांना यावर्षीची थीम “आरोग्यदायी माती – आरोग्यदायी शहरे” अशी ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सिमेंट-डांबरामुळे जमिनीची झिरपण क्षमता कमी होत असल्याने पूरस्थिती, उष्णतेत वाढ आणि प्रदूषणाचा धोका वाढत आहे. त्यामुळे वृक्षांनी समृद्ध अशा हिरव्या जागा वाढवणे, झिरपणक्षम क्षेत्रे तयार करणे आणि पर्यावरणपूरक गाव नियोजन यावर भर देत, अधिक सक्षम आणि आरोग्यदायी गावे, शहरे घडवण्याचे आवाहन त्यांनी केले.
सद्यस्थितीत तोडणी झालेल्या उसामधील उर्वरित पाचट जाळू नये, पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे याची माहिती देऊन पाचट कुजवण्यासाठी करावयाच्या उपायोजना व खोडवा ऊस पिकाचे एकात्मिक कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन, सद्यस्थितीत खोडवा ऊस पिकामध्ये अन्नद्रव्य कमतरतेमुळे निर्माण झालेली जांभळसर पाने विकृती, फुले ऊस १३००७ मधील तांबेरा व गवताळवाढ रोग यांची निरीक्षणे दाखवून व्यवस्थापनाच्या उपायोजना येळकर यांनी सुचवल्या. प्रगतिशील शेतकरी माऊली साबळे यांनी पाचट ठेवल्यामुळे झालेले फायदे बाबत त्यांचे अनुभव कथन केले. यावेळी गटप्रमुख शरद शिंदे, रामराव कराड, प्रशांत साबळे, माऊली कांडके, सोमेश्वर साबळे, विष्णू साबळे, राजभाऊ कांबळे, सुरज साबळे, किसनराव साबळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…असे करा खोडवा ऊस व पाचट व्यवस्थापन
* ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी यंत्र उपलब्ध असल्यास त्या यंत्राच्या सहाय्याने पाचटाची कुट्टी करावी.
* कुट्टी यंत्र उपलब्ध नसल्यास, ऊस तुटून गेल्यावर पाचट सरीमध्ये एकसारखे पसरावे.
* आंतरमशागत करून मोकाट पाणी द्यायचे असल्यास प्रत्येक सरीआड पाचट जमा करावे, ज्या सरीत पाचट नाही तेथे आंतरमशागत करता येते.
* पाचटाचे आच्छादन केल्यानंतर किंवा कुट्टी केल्यानंतर ऊसाच्या बुडख्यावर पडलेले पाचट बाजूला करून बुडखे मोकळे करावे.
* ऊसाचे बुडखे उंच राहिल्यास ते जमिनीलगत कोयत्याने किंवा ट्रॅक्टरचलित बुडखे छाटणी यंत्राने छाटून घ्यावेत.
* रोग व किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ऊसाच्या बुंध्यावर कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यू पी बुरशीनाशक २ ग्रॅम व क्लोरोपायरीफॉस २० टक्के ईसी कीटकनाशक २.५ मिली प्रति १ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* पाचट कुजवणाऱ्या जिवाणूंची क्रिया जलदगतीने होण्यासाठी स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी द्यावे.
* पाचटाचे कर्ब:नत्र गुणोत्तर २४:१ च्या जवळ आणण्यासाठी उसाच्या पाचटातील नत्राचे प्रमाण वाढवले पाहिजे, त्यासाठी पाचटावर एकरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट खत पसरवून टाकावे.
* पाचट कुजण्याची क्रिया जलदगतीने होण्यासाठी जिवाणू संवर्धक वेस्ट डीकंपोजर कल्चर घेऊन २०० लिटर पाण्यात मिसळावे त्यामध्ये दोन किलो गुळ मिसळावा, पाच ते सहा दिवसांनी तयार झालेले २०० लिटर वेस्ट डीकंपोजर द्रावण फवाऱ्याच्या सहाय्याने पाचटावर फवारावे.
– शिवप्रसाद येळकर, ऊस विकास अधिकारी, ट्वेंटीवन शुगर्स, सायखेडा.


















