सातारा : सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वच क्षेत्रात होऊ लागला आहे. यासाठी अनेक प्रकारची ॲप प्ले स्टोअरला उपलब्ध आहेत. आता राज्याच्या कृषी विभागानेही एआय अँप तयार करून आघाडी घेतली आहे. गुगल प्ले स्टोअरवरून महाविस्तार एआय ॲप इन्स्टॉल करून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे. शेती कशी करायची, हवामान अंदाज, खतांचा वापर याची माहिती या ॲपमध्ये दिली आहे. चॅटबॉक्सची एक विशेष सुविधा दिली आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार हे ॲप कृषी विभागाने सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका क्लिकवर घरबसल्या सर्व माहिती मिळणार आहे.
याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले की, शेतीमध्ये एआयचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीपासून काढणीपर्यंत सल्ला देणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असलेले महाविस्तार ॲप कृषी विभागाने तयार केले आहे. हे ॲप शेतकन्यांना आधुनिक शेती व विविध योजनांसह पीक पद्धतीत मार्गदर्शक ठरणार आहे. यामध्ये कृषीच्या योजना, हवामानाबाबतची माहिती, पीक सल्ला, खतांच्या मात्रांचा अंदाज, कीड व रोगांविषयीची माहिती, बाजारभाव पाहण्याची सुविधा याचा समावेश आहे. सध्याच्या ‘एआय’च्या जमान्यात कृषी विभाग या माध्यमातून आघाडीवर राहिला आहे. शेतकन्यांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर चॅटबॉक्सद्वारे त्वरित मिळणार आहे. शेतकरी हा शेतात विविध पिके घेत असतो. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांना योग्य सल्ला मिळण्यासाठी महाविस्तार अँपची मदत होणार आहे. यामध्ये फवारणी, खतांचा वापर, हवामानाचा अंदाज या सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत.

















