सांगली : रस्त्यांवरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी वाहन सहजपणे दिसावे आणि अपघात टाळावेत, या उद्देशाने डफळापूर- कुडनूर येथील श्रीपती शुगर अँड पॉवर लि. कारखान्यामार्फत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टरचे वाटप करण्यात आले. कवठेमहांकाळ महामार्ग पोलिस केंद्र विभागाचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण नवले यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबवण्यात आला. कारखानास्थळी झालेल्या कार्यक्रमात वाहनचालकांना रिफ्लेक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक अनिल सावळे यांनी चालकांशी संवाद साधत वाहतूक नियमांचे पालन, वाहनांची नियमित तपासणी, वेगमर्यादा आणि रात्रीच्या सुरक्षित वाहन चालवण्याबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमावेळी हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील, सुहास स्वामी, संतोष घाडगे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. तसेच ‘श्रीपती शुगर’चे जनरल मॅनेजर महेश जोशी, शेती अधिकारी सतीश मिरजकर, एच. आर. मॅनेजर रणजित जाधव यांच्यासह अधिकारी- कर्मचारी, वाहनचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सहाय्यक निरीक्षक नवले यांनी सांगितले की, रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर आवश्यक आहेत. ऊस वाहतूक वाहनांची संख्या हंगामात मोठी असल्याने त्यांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे गरज आहे. रिफ्लेक्टरमुळे अपघात टाळण्यास मोठी मदत मिळते. रिफ्लेक्टर अचूक बसवणे आणि नियमितपणे तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारखाना प्रशासनाने सांगितले की, शेतकरी, चालक आणि कारखाना यांच्यातील सुसंगती अधिक मजबूत राहावी, सुरक्षितता प्रथम प्राधान्याने घेण्यात यावी, यासाठी हा उपक्रम आयोजित केला.


















