लातूर : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर किल्लारी येथील नीळकंठेश्वर साखर कारखाना नव्याने नूतनीकरण करून पुन्हा सुरू झाला असून, पहिल्याच गाळप हंगामात १८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. हंगामातील पहिल्या साखर पोत्याचे पूजन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संतोष बेंबडे, कार्यकारी संचालक डी.एल. पतंगे, तुकाराम पवार, इंजिनिअर भोसले, आण्णासाहेब मोरे, संतोष वाडीकर, मुख्य शेतकी अधिकारी कल्याण शिंदे, ऊस पुरवठा अधिकारी युवराज धुमाळ, सिव्हिल इंजिनिअर गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कारखान्याला पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांना यश येत कारखान्याचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान, नव्या सुविधा आणि गाळप क्षमता वाढवून कारखाना आता पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला आहे. दोन जिल्हे आणि चार तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कारखाना पुन्हा सुरू होणे म्हणजे मोठा दिलासा आहे.
वाहतूक खर्चात बचत, वेळेवर गाळप आणि योग्य दर मिळण्याची हमी यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. स्थानिक अर्थव्यवस्थेलाही या कारखान्यामुळे नवसंजीवनी मिळत असून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या हंगामात तीन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सुरवातीपासून गाळपाचा वेग समाधानकारक आहे. कारखान्याच्या सुरवातीमुळे ग्रामीण भागात औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून, शेतकरी हितासाठी हे पाऊल ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.


















