सातारा : गाळप, साखर उत्पादन आणि आर्थिक व्यवस्थापनात अग्रेसर असलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हगामामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात गाळपास आलेल्या उसाचे प्रति मेट्रिक टन ३५०० रुपयांप्रमाणे एकूण २६ कोटी ४० लाख रुपये बिलाची रक्कम सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजित विजयसिंह शिदे यांनी दिली.
कारखान्यात नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गाळपास आलेल्या ऊसापोटी प्रति मेट्रिक टन ३५०० रुपयांप्रमाणे एकूण २६ कोटी ४० लाख रुपयांची ऊस बिले संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केल्याने समाधान व्यक्त होत आहे. कारखान्याला घातलेल्या उसाच्या बिलांची रक्कम बँक खात्यांमध्ये जमा झाल्याने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस सह्याद्रि कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून या हंगामातील गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन व माजी सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. या हंगामातही गाळपाचे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला आहे.


















