कोल्हापूर : उसाच्या वजनातील काटामारी रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीने वजन काटा उभारला आहे. तो काटा २४ तास सुरू आहे. शेतकऱ्यांनी उसाचे वजन त्या काट्यावर करूनच आपला ऊस कारखान्याला पाठवावा, असे आवाहन आंदोलन ‘अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे. ते म्हणाले, ऊसतोड मजूर आणि वाहतूकदार यांच्याकडून खुशालीची शेतकऱ्यांवर बळजबरी सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणीही कोणत्याही कारणास्तव कोणालाही ऊस तोडण्यासाठी किंवा वाहतूक करण्यासाठी एक रुपया पण पैसे देण्याची आवश्यकता नाही. कारण मजुरांना गावातून घेऊन येण्याचा आणि सोडण्याचा, मजुरांना कोयते, बांबू, तट्टे, वायर रोप, झोपडी उभारण्याचा खर्च, मजुरांचा विमा शेतकरी आपल्या खर्चातून उतरतो. याशिवाय ऊसतोड मजुरांच्या सेवा सुविधांसाठी म्हणून गोपीनाथ मुंडे महामंडळास प्रति टन दहा रुपये शेतकरी देतो. ऊस तोडून १०० मीटर खांद्यावर वाहतूक करून तो वाहनात भरण्यासाठीचे पैसेही शेतकरी देतो. त्यामुळे मजुरांचा सगळा खर्च वाहतूकदारांचा खर्च कारखाना शेतकऱ्यांच्या ऊस गाळपापासून आलेल्या उत्पन्नातून करत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आणखी पैसे मागणे हा सरळ सरळ अन्याय आहे.
खुशाली एन्ट्रीची मागणी झाल्यास आंदोलन अंकुश संघटनेकडे फक्त फोन करून तक्रार करा. आपल्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन संबंधित कारखान्यावर कारवाई करण्यास साखर संचालक यांना भाग पाडले जाईल. त्यांचे पैसे परत करण्यास भाग पाडले जाईल. तसेच ज्या शेतकऱ्यांची क्रम पाळी डावलली गेली असेल किंवा आडसाली ऊस तोडला जात नसेल तर त्यांनी या तक्रारी आमच्याकडे कराव्यात.


















