पुणे: पारगाव येथील दत्तात्रेय वळसे-पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला शनिवारी भेट दिली. यादरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात उसापासून साखर निर्मिती कशी होते हे जाणून घेतले. याप्रसंगी प्राचार्य रामनाथ फदाले, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, शिक्षक यांच्यासह १५४ विद्यार्थी उपस्थित होते. भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, सचिव चंद्रकांत ढगे यांनी या भेटीसाठी सहकार्य केले.
यावेळी उत्पादन विभाग अधिकारी सुभाष कुंभार यांनी साखर कारखान्याची यंत्रसामग्री दाखवली. उसावरील विविध प्रक्रिया समजावून सांगितल्या. साखर तयार करताना उस छाटून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे केले जातात. उसाचा रस उकळून त्यात इतर रसायने मिसळून त्याचे ब्लिचिंग केले जाते. तपकिरी काळपट मळी एका बाजूला व साखरेचा पाक दुसऱ्या बाजूला काढला जातो. विशिष्ट आकाराच्या जाळीतून हा पाक गाळला जातानाच वाळतो व साखरेचे दाणे बनतात. यांत्रिक पद्धतीने लगेच पोती भरून हवाबंद केली जातात, अशी माहिती भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात आली.


















