सांगली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, सांगली जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा शेती विभाग तोडणी मजुरांच्या तालावर नाचत असल्याचे चित्र आहे. कारखाना व्यवस्थापनाचा त्यांच्यावर कोणताही वचक नाही. त्यामुळे हे मजूर ज्यांचा ऊस चांगला, ‘दक्षिणा’ मिळते, याकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना रोज नवा त्रास सहन करावा लागत आहे. कार्यक्षेत्रातील प्रभावी नेता किंवा पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून कारखाना परिसराऐवजी बाहेरील गावातील उसाला ही प्राधान्य दिले जात आहे. याउलट ज्यांनी वर्षानुवर्षे कारखान्यात सभासद म्हणून निष्ठा दाखवली, त्या सभासदांचा ऊस शिवारात सडत आहे. सुरुवातीला ओल असल्याने रस्त्याकडेला असणारा ऊस तोडण्यास प्राधान्य देण्यात आले. यात अनेक शेतकऱ्यांचा खोडवाही गेला. अधिकारी फोन उचलत नाहीत. आम्ही हात जोडून विनंती करत बसायचं काय, असा संतप्त सवाल केला जात आहे.
अनेक शेतकरी आडसाली लागण असलेला ऊस तोडा, म्हणून शेतकरी वारंवार मागणी करत आहेत. या उसाला १७ ते १८ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र ऊस फडातच उभा आहे. जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे हाल संपण्याची चिन्हे नाहीत. सभासदांनी वेळेवर नोंदणी केली. नियमांप्रमाणे ऊस तोडीची अपेक्षा आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. ज्यांच्याकडे राजकीय ‘वजन’ तोडणी मजुरांचे हात ‘ओले’ करण्याची ताकद, त्यांच्या शेतातील ऊस तातडीने तोडला जात आहे. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्यांच्या व्यवस्थापनाने पारदर्शकता दाखवून अत्यंत काटेकोरपणे ऊस तोड जमली नाही, तर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव यांनी सांगितले की, साखर कारखाना व्यवस्थापनाने निःपक्षपातीपणे तोडणी कार्यक्रम राबवावा, यासाठी आंदोलन करण्याची वेळ कारखानदारानी आणू नये.

















