नाशिक : यंदा अतिवृष्टीमुळे चालू वर्षी सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त ऊस पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे ऊस तोडणी वेळेवर झाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. मात्र दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास ऊसतोडणी वेळेवर न झाल्यास ऊस उत्पादकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे. सद्यस्थितीत दिंडोरी तालुक्यात ऊस तोडणी वेळेवर होत नसल्याने संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी करंजवण येथे कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गट कार्यालयाला टाळे लावत निषेध व्यक्त केला. कारखान्याने करंजवण परिसरामध्ये त्वरित १५ ते २० टोळ्या तातडीने देण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी ऊस उत्पादकांनी दिला आहे. उपसरपंच प्रकाश देशमुख, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, सदनराव मोरे, संजय मोरे, डॉ. विष्णू मोरे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये कारखान्याचे गाळप सुरु झाले आहे. गळीत हंगाम सुरू होऊन महिना उलटूनही करंजवण परिसरात अद्याप ऊस तोडणीला प्रारंभ करण्यात आलेला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. दोन ते तीन दिवसांत करंजवण परिसरामध्ये ऊस तोडणी टोळ्या दाखल न झाल्यास कारखाना बंद करण्याचा इशारा येथील ऊस उत्पादकांनी दिला आहे. दरम्यान, कारखान्याचे शेतकी अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ यांनी सांगितले की, कारखान्याला कार्यक्षेत्राबाहेरील उसाचीही गरज आहे. आता कार्यक्षेत्राबाहेर गेलेले ऊसतोड कामगार कार्यक्षेत्रात परतत असून, करंजवणसह सर्व क्षेत्रांत मजुरांच्या टोळ्या पाठविण्यात येतील, करंजवणला दोन टोळ्या उद्याच जातील.


















