पुणे : सोमेश्वर कारखान्याकडून चार वर्षांतील थकीत एफआरपी, व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून सन २०२१ ते २०२४ या चार गाळप हंगामांतील एफआरपी आणि विलंबित रकमेवरील व्याज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. शेतकरी कृती समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या याचिकेनंतर हायकोर्टाने एफ. आर. पी. एकरकमी आणि १५ टक्के व्याजासहित देण्याचे आदेश दिले. या न्यायालयीन दबावामुळेच कारखान्याने व्याज जमा केले असून, तेही पूर्ण न देता अर्धवट दिल्याचा दावा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केला. उर्वरित व्याज व या प्रकरणाचा पूर्ण खुलासा व्हावा म्हणून विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे.

सतीश काकडे म्हणाले की, कायद्यानुसार ऊस तुटल्यापासून १४ दिवसांत एफ. आर. पी. देणे बंधनकारक आहे, आणि विलंब झाल्यास १५ टक्के व्याज देणे आवश्यक असते. मात्र, सोमेश्वर कारखान्याने मागील चारही हंगामांमध्ये शेतकऱ्यांना कमी आणि विलंबाने रक्कम दिली. याबाबत न्यायालयीन लढाईनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, या संपूर्ण यशाचे श्रेय कारखान्याच्या चेअरमनला नसून, शेतकरी कृती समितीच्या सातत्यपूर्ण लढ्याला आहे. दरम्यान, कारखान्याने २०२४-२५ या हंगामाचा अंतिम भाव २०२३-२४ पेक्षा कमी का? असा सवाल काकडे यांनी केला. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेला लढा पुढेही कायम ठेवला जाईल, अशी भूमिका शेतकरी कृती समितीने जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here