सातारा : जिल्ह्यात यंदा नऊ सहकारी व आठ खासगी अशा एकूण १७ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. या १७ साखर कारखान्यांनी २९ लाख ५२ हजार ८१ टन उसाच्या गाळपाद्वारे २५ लाख ३५ हजार ५०५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या कारखान्यांनी प्रतिटन ३ हजार ते ३५०० रुपये दर जाहीर केला आहे. अनेक कारखान्यांची बिले शेतकऱ्यांचा खात्यावर जमा करण्यात आली आहेत. मात्र ऊसतोड मजुरांकडून होत असलेली फसवणूक, ते मध्येच पळून जाण्याचे प्रकार सुरू झाल्याने साखर कारखानदार हैराण झाले आहेत. तर अपेक्षित ऊस तोडणी यंत्रणा नसल्याने आणि हार्वेस्टरची अपुरी संख्या असल्याने ऊस तोडणी कार्यक्रम विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आडसाली, सुरू व खोडवा मिळून सुमारे ९० लाख हेक्टरवर उसाचे क्षेत्र उपलब्ध आहे. उसाचे क्षेत्र व गाळपाचे उद्दिष्ट यानुसार साखर कारखान्यांनी तोडणीचे नियोजन केले. मात्र मजुरांची पळवापळवी तसेच फसवणूक अशा घटनांमुळे अनेक कारखान्यांची तोडणी यंत्रणा विस्कळीत झाली आहे. कमी असलेले मनुष्यबळ, हार्वेस्टरची अपुरी संख्या यामुळे ऊस तोडणी कार्यक्रम विस्कळीत झाला आहे. त्यामुळे साखर कारखानदारांबरोबरच शेतकरीही हैराण झाले आहेत. कारखान्यांनी आपल्या ऊस तोडणी यंत्रणेत सुधारणा करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने केली जात आहे.


















