सातारा : शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादनाचा खर्च लक्षात घेऊन दर दिला जावा, दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द करावी या मागण्यांसाठी सोलापूर ते पुणे आयुक्त कार्यालय अशी ‘जागर यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेची ‘जागर यात्रा’ सोमवारी साताऱ्यात दाखल झाली. यावेळी रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अँड. माणिकराव शिंदे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, राजेंद्र बर्गे, डॉ. प्रगती खरे चव्हाण, वनिता महाडिक, अशोक रसाळ, लक्ष्मण पाटील, वसीम इनामदार, दिलीप बर्गे, अशोक जगताप, आदी उपस्थित होते. यांसह साखर आयुक्तालयाचे नाव ऊस आयुक्त कार्यालय करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील केली.
रघुनाथदादा पाटील म्हणाले की, महाराष्ट्र ऊस उत्पादन आणि साखर निर्मितीत अग्रेसर आहे. मात्र,
उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना राज्यापेक्षा महाराष्ट्रात उसाचा दर कमी आहे. उसाला उत्पादन खर्चावर
आधारित भाव मिळावा, दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी, अशी शिफारस अनेक नेत्यांनी केली होती. आम्ही सुद्धा हीच मागणी करतोय. मात्र केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकरी विरोधी कायदे करून त्याविरुद्ध कोणालाही न्याय मागता येणार नाही अशी तरतूद करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे आणि शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाची लूट थांबवण्यासाठीच गेल्या सात दिवसांपासून शेतकरी संघटनेचा महाराष्ट्रभर जागर आंदोलन सुरू आहे. १२ डिसेंबर रोजी शेतकरी नेते शरद जोशी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा बाबू गेनू स्मृतिदिन आहे. यादिवशी या मागण्यांसाठी आयुक्त कार्यालयासमोर जन आंदोलन केले जाईल.


















