‘ओंकार’तर्फे ऊसदर जाहीर, शेतकऱ्यांनी ऊस देऊन सहकार्य करावे : चेअरमन बोत्रे-पाटील यांचे आवाहन

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील पॉवर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड युनिट पाच व १५ या साखर कारखान्यांच्या २०२५-२६ साठीच्या गळीत हंगामात येणाऱ्या उसाला ३२०० रुपये प्रतिटन दर जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ओंकार साखर कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी केले. या दोन्ही कारखान्यांसाठी कारखाना व्यवस्थापनाने गळीत हंगाम २०२५-२६ साठी गाळपास येणाऱ्या उसाचा दर निश्चित केला असून, प्रतिटन रुपये ३००० चा दर जाहीर केला आहे. त्यापैकी पहिला हप्ता २९०० प्रमाणे अदा केला जाईल व दुसरा हप्ता १०० रुपयांप्रमाणे दिवाळीमध्ये अदा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, १ मार्च २०२६ पासून गळितास येणाऱ्या उसाला अधिकचे रुपये १०० असे एकूण ३१०० चा दर व १ एप्रिल २०२६ पासून गळितास येणाऱ्या उसाला अधिकचे २०० रुपये असे एकूण ३ हजार २०० रुपये असा दर देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे. मागील वर्षाप्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना सीझन २०२५-२६ मध्ये गळितास आलेल्या टनेजनुसार कारखाना धोरणाप्रमाणे दिवाळीमध्ये मोफत साखर वाटप करण्यात येईल. कारखान्यास ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे सहकार्य आणि विश्वास नेहमीच कारखान्यासोबत राहिला आहे. यापुढेही कारखाना आपल्या हितासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास तत्पर राहील, अशी ग्वाही ओंकार शुगरचे जनरल मॅनेजर व्ही. एम. गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here