सातारा : चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्समध्ये गळीत हंगामात ५० टनी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर उसाचे खोटे वजन दाखवून संगनमताने गैरप्रकार केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी वजनकाटा कारकून, त्याचा साथीदार आणि ट्रॅक्टर मालक अशा तिघांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये तब्बल एक लाख पाच हजार रुपयांची फसवणूक उघड झाली आहे. अटकेत असलेल्या दर्शन प्रताप शेडगे (रा. चिमणगाव) आणि सतीश नारायण चव्हाण (रा. एकंबे) यांच्या पोलीस कोठडीची मुदत न्यायालयाने आणखी एक दिवस वाढविली.
पोलिसांनी सांगितले की, शेडगे आणि चव्हाण या दोघांना अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक संदिप सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासात संशयितांनी वजनकाटा प्रणालीचा गैरवापर करून उसाचे बनावट वजन दर्शवून आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी संशयितांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी दिली. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित गायकवाड तपास करत आहेत.


















