सांगली : क्रांतिअग्रणी साखर कारखान्यामार्फत खोडवा ऊस पीक चर्चासत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अंकलखोप विकास सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी उसाची लागण तुटल्यावर खोडवा उसात पाचट व्यवस्थापन, बुडखे तासणी, औषध फवारणी व खत व्यवस्थापन ही कामे पंधरा ते वीस दिवसांत करावीत. पाचटाची अंशतः कुट्टी करावी. जमिनीवरील कांड्या चिंबवण्यासाठी ट्रॅक्टरचलित मल्चर यंत्र फायद्याचे आहे. शेतकऱ्यांनी लागणीएवढेच खोडवा उसाचे उत्पादन घेण्यासाठी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. कारखाना विविध योजना राबवित आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी केले. अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उमेश जोशी होते.
ऊस विकास अधिकारी जाधव म्हणाले की, “मल्चरमुळे कष्ट, मशागत व खर्चात बचत होते. खोडवा व निडवा पिकासाठी आवश्यक सुविधा अनुदान व इतर निविष्ठा उधारीने, तसेच मजूर खर्चासाठी रोखीचे अर्थसहाय्य कारखाना उपलब्ध करून देत आहे. यावेळी संचालक शीतल बिरनाळे, नितीन नवले, अंकलखोप विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष रवी पाटील, प्रवीण माने, अमर पाटील, संतोष मिरजकर, प्रवीण मिरजकर, शामराव नवले, महेश नवले, विलास हजारे, भरत बिरनाळे, सौरभ गायकवाड, सुनील सूर्यवंशी, वसंत कोल्हे, रवी मिरजकर, अमोल पाटील, अतुल पवार, सुहास हानमाने, अनिकेत सूर्यवंशी, विजय लुगडे, आर. डी. नवले, पंडित हजारे, प्रशांत विभुते, सतीश पाटील, विकास पाटील, अण्णासो पाटील उपस्थित होते.


















