हिंगोली : शिवाजीराव जाधव येथील बळीराजा साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी २ हजार ९५० रुपये प्रतिटन भाव जाहीर केला असून साखर उतारा अधिक आल्यास त्यात वाढ केली जाईल, अशी घोषणा चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी केली. ते म्हणाले, कारखान्याकडे ११ हजार २५६ हेक्टर उसाची नोंद शेतकऱ्यांनी केली आहे. मागील ३२ दिवसांत सोमवारपर्यंत (ता. आठ) १ लाख ५५ हजार टन उसाचे गाळप केले आहे.
जाधव यांनी सांगितले कि, गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला २ हजार ९५० प्रतिटन हमीभाव देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रतिटनप्रमाणे पहिला हप्ता उचल स्वरूपात २ हजार ५००, दुसरा हप्ता जून महिन्यात ३०० रुपये, तिसरा हप्ता दीपावली सणासाठी १५० रुपयांप्रमाणे अदा करण्यात येईल. साखर उतारा, शासनाच्या एफआरपी धोरणानुसार जास्तीत जास्त ऊसदरही देण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा प्रयत्न राहील. ठरल्याप्रमाणे ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. सभासदांचा ऊस गाळप झाल्यानंतर बिगर सभासदांचा सुद्धा ऊस गाळपासाठी आणण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही शिवाजीराव जाधव व कार्यकारी संचालक अजय जाधव यांनी दिली.


















