सांगली : उसाच्या फडात बछड्यांसह बिबट्या आढळला, ऊस तोडणी १५ दिवस बंद

सांगली : शिराळा तालुक्यातील कापरी येथील उसाच्या फडात वारंवार बछडे आढळून येत असल्याने ऊसतोड मजूर तोडणीचे काम करताना घाबरत होते. त्यामुळे वन विभागाने ऊसतोड मजुरांसमवेत आठ कर्मचारी दररोज सकाळी काम सुरू झाल्यापासून ते सायंकाळी संपेपर्यंत त्या परिसरात ठिकठिकाणी तैनात केले होते. मात्र सोमवारी (ता. ८) दुपारी पुन्हा त्याच बिबट्याचे दोन बछडे उसात आढळून आले. त्यामुळे वन विभागाने त्या बछड्यांना सुरक्षितस्थळी ठेवण्याच्या सूचना दिल्या. उर्वरित ऊस तोडून तातडीने भरून घेऊन जाण्याच्या सूचना मजुरांना दिल्या. पुन्हा आजूबाजूच्या परिसरात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. बिबट्या आपल्या बछड्यासाठी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सुरक्षितता म्हणून कापरी येथील १५ दिवसांसाठी ऊसतोड थांबवण्यात आली आहे.

कापरी (ता. शिराळा) येथील उसाच्या फडात मुक्काम केलेला बिबट्या दोन बछड्यांसह कापरीचा शिवार सोडण्यास तयार नाही. याची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, ‘सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक सुशीलकुमार गायकवाड, प्राणिमित्र धीरज गायकवाड, शिराळा रेस्क्यू टीम यांनी ऊस तोडणीचे काम बंद झाल्यावर सायंकाळी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले. बछड्यांना कॅरेटमध्ये ठेवून त्यामध्ये ऊबदार पालापाचोळा ठेवला. सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांनी सायंकाळी सातच्या दरम्यान घटनास्थळाची पाहणी केली. ट्रॅप कॅमेरे लावून अधिकारी, प्राणिमित्र त्या ठिकाणाहून बाजूला जात असताना काही क्षणांत मादी बछड्यांना घेऊन गेली. याबाबत वनपाल अनिल वाजे यांनी सांगितले की, आठवड्यात चारवेळा अशी घटना घडली आहे. तीनवेळा त्यांची पुनर्भेट घडवून आणली आहे. बछड्यांमुळे मादी आक्रमक होण्याची शक्यता असते. त्यामुळे कापरी येथील ऊसतोड १५ दिवसांसाठी बंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here