अहिल्यानगर : मुळा सहकारी साखर कारखान्याने गेल्या ३६ दिवसांत एकूण दोन लाख ९६ हजार ७६० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, दोन लाख ९ हजार ५० साखर पोत्याची निर्मिती झाली आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ९.४७ इतका आहे. आज एका दिवसात दहा हजार १०० मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन एका दिवसात ७,७०० साखर पोते निर्मित होऊन आज एका दिवसाचा साखर उतारा १०.३२ इतका राहिला. कारखान्याचे मार्गदर्शक आमदार शंकरराव गडाख यांनी हंगामापूर्वी सर्व विभागांच्या स्वतंत्र बैठका घेऊन गळीत हंगामाचे नियोजन केले होते. गेल्या ३६ दिवसांच्या हंगामात अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले संचालक मंडळ व शेतकी विभागाच्या अथक प्रयत्नाने कुठलीही मोठी अडचण न येता पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप सुरू आहे.
याचबरोबर कारखान्याने आपला सन २०२२ मध्ये एकाच दिवशी झालेल्या १००७० मेट्रिक टन ऊस गाळपाचा विक्रम मोडीत काढला. या विशेष कामगिरीबद्दल सभासद व शेतकऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे. यासोबतच इथेनॉल प्रकल्प व वीज निर्मितीत सुध्दा अतिशय चांगली स्थिती आहे. कार्यक्षेत्रातील नोंद असलेल्या सर्व उसाचे गाळप वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गडाख यांनी सूचना केल्यानुसार सर्व गटात नियमानुसार उसतोडी सुरू आहेत अशी माहिती सचिव रितेश टेमक यांनी दिली. कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर म्हणाले की, यंदा सर्व गटांचा आराखडा समोर ठेवून तोडीचे नियोजन केल्याने रोजचे गाळप व्यवस्थित सुरू आहे.


















