पुणे : सोमेश्वर कारखान्याकडील थकीत साडेतीन कोटी व्याजासाठी सतीश काकडे यांची हायकोर्टात धाव

पुणे : सोमेश्वर कारखान्याने राज्य सरकारच्या बेकायदा परिपत्रकाप्रमाणे २ कोटी ३९ लाख व्याज देऊन दिशाभूल केली आहे, असा आरोप शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केला. मागील चार हंगामात एफआरपीस विलंब केल्याने व्याज द्यावे लागले, ही अभिमानाची नव्हे तर लाजिरवाणी बाब आहे. कारखान्याकडून केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांना आणखी तीन ते साडेतीन कोटी रुपये व्याज कृती समिती मिळवून देणार आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात दावा केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. कारखान्याच्या अध्यक्षांनी मागील चार हंगामात एफआरपीपेक्षा अनुक्रमे प्रतिटन २१८, ४९९, ६९७, २२६ रुपये प्रतिटन जास्त दिले, असे सांगितले, हीदेखील दिशाभूलच केली आहे. २०१३-१४ ते २०१५-१६ हे तीन हंगाम केवळ २२५७ रुपये प्रतिटन एवढाच दर दिला होता असे ते म्हणाले.

याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे काकडे यांनी ‘सोमेश्वर’ कारखान्याने पहिली उचल ३,५०० रुपये द्यावी अशी मागणी केली. त्यांनी सांगितले की, कारखान्याने प्रतिटन ३,३०० रुपये देऊन टिमकी वाजविली आहे. वास्तविक शेजारच्या ‘दत्त इंडिया’ या खासगीने आणि ‘माळेगाव’नेही तेवढीच उचल दिली आहे. तर सांगली, कोल्हापूरमध्ये कारखान्यांकडून ३५०० ते ३६०० रुपये उचली आहेत. शेजारच्या अडचणीतल्या छत्रपती व इंदापूर कारखान्याने ३२०० रुपये उचल दिली आहे. सोमेश्वरने ३५०० रुपये उचल द्यावी, अशी मागणी काकडे यांनी केली. कारखान्याने यापूर्वी शिल्लक साखरसाठ्याचे कमी मूल्यांकन करून प्रतिटन ५८३ रुपये कमी दिले होते, हे सभासद विसरणार नाहीत, असेही ते म्हणाले. सद्यस्थितीत राज्य सरकारच्या एफआरपी धोरणानुसार ‘सोमेश्वर ने २०२१-२२ ते २०२४- २०२५ या चार हंगामात दोन टप्प्यात एफआरपी दिली. ती देताना विलंब झाल्याने नुकतेच २ कोटी ३९ लाख रुपये व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. असे व्याज देणारा राज्यातला पहिला कारखाना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here