साखर उद्योगातील दीपस्तंभ हरपला…पी.जी.मेढे यांचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासह विविध कारखान्यांवर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिलेले, साखर उद्योगाचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मार्गदर्शक पी. जी. मेढे यांचे निधन झाले. साखर उद्योगाचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अशी त्यांची ओळख होती. सहकार आणि साखर उद्योगातील विविध पुरस्कारांनी पी.जी. मेढे यांना सन्मानित करण्यात आले होते.

देशातील साखर उद्योग, ऊस शेती आणि शेतकरी, साखर कामगार आदी विषयावर पी. जी. मेढे यांनी ‘चीनीमंडी’च्या माध्यमातून ‘साखर उद्योगाची दशा आणि दिशा’ (Condition and Direction of Sugar Industry) ही साप्ताहिक मालिका लिहिली. या मालिकेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून भरभरून प्रतिसाद मिळाला. ते आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत साखर उद्योगाच्या हितासाठी कार्यरत राहिले. त्यांच्या जाण्याने साखर उद्योगाची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया साखर उद्योगातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडूनही संवेदना व्यक्त

साखर उद्योगातील जाणकार अभ्यासक, छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक पी. जी मेढे यांचे नुकतेच निधन झाले. गेली ३० वर्षाहून अधिक काळ साखर कारखानदारीबरोबरचा आमचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षामध्ये कारखानदार व शेतकरी आंदोलक यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम मेढे साहेब करत असत व लवकरात लवकर आंदोलन मिटविण्याचा ते प्रयत्न करत. दरवर्षी त्यांच्यामध्ये व संघटनामध्ये वैचारिक वाद व्हायचां पण त्यांनी कधी व्यक्तीगत कटूता निर्माण केली नाही.

साखर उद्योगातील त्यांना चांगला अभ्यास होता. त्यांनी राज्य व केंद्र सरकारला साखर उद्योगात अनेक चांगले धोरण तयार करण्याबाबत उपाययोजना सुचविण्याचे काम त्यांनी केले. केंद्र किंवा राज्य सरकार जेव्हा साखर उद्योगातील चुकीचे धोरणे राबवित असत तेंव्हा ते ठामपणे आमच्या सोबत राहून त्याबद्दल स्पष्टपणे आपली भुमिका जाहीर करत असत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here