अहिल्यानगर : श्रीगोंदे तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगरने चालू गाळपात दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला, तर देवदैठण येथील युनिट सुरू करण्यात आले आहे. गौरी शुगरचे दहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. या हंगामासाठी गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३ हजार २०० रुपये दर देणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता ३१०० रुपये प्रमाणे काढणार आहे, अशी माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली.
बोत्रे-पाटील म्हणाले की, गेल्या वर्षी ३१०६ रुपये दर आणि उसाच्या प्रमाणात दिवाळीला मोफत साखर दिली होती. यंदा साखर कामगारांना २० टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला. हा आर्थिक भार सहन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हिच विचारात घेऊन गौरी शुगरने पहिला हप्ता ३१०० रुपयांनी काढण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच दिवाळीला १०० रुपये आणि उसाच्या प्रमाणात मोफत साखर देण्यात येणार आहे. आमची कुणाशीही कसलीच स्पर्धा नाही. फक्त शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, हे धोरण आहे, असेही बोत्रे-पाटील म्हणाले. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास पाठवावा, असे आवाहन कार्यकारी संचालक रोहिदास यादव यांनी केले.


















