सोलापूर : वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया शुगर्सच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला २८०० ते ३,००० रुपये दर देण्यात येणार आहे. कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या उसाला जिल्ह्यात सर्वोच्च दर देण्याची देत कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कारखाना व्यवस्थापनाने यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला तीन प्रकारचा दर देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी दिली. कारखान्याने गेल्या ४१ दिवसांत १ लाख ७५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने यावर्षी गाळप क्षमता वाढवून ती प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन केली आहे असे त्यांनी सांगितले.
चेअरमन जाधव यांनी सांगितले की, कारखान्यात ३१ जानेवारी अखेरपर्यंत येणाऱ्या उसाला प्रतीटन २८०० रुपये दर मिळेल. तर फेब्रुवारीमध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रतीटन २९०० रुपये मिळतील. मार्च महिन्यात गाळपास येणाऱ्या उसाला ३,००० रुपये प्रतिटन दर देण्यात येणार आहेत. जानेवारी महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या पिकासाठी पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे शेतकरी आपला ऊस लवकरात लवकर गाळपास कसा जाईल यासाठी धडपड करतात. मात्र जानेवारी महिन्यापासून पुढे गाळपास येणाऱ्या उसाला चांगला उतारा मिळतो. ही बाब ओळखून जकराया शुगरने तीन महिन्यासाठी तीन वेगवेगळी बिले देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी संचालक राहुल जाधव, मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर, मुख्य वित्त अधिकारी अनिल पवार, केन मॅनेजर विजय महाजन, जकराया मल्टीस्टेटचे जनरल मॅनेजर बाळासाहेब जाधव, शुगर सेलचे रितेश जगताप, पर्चेस अधिकारी भाऊसाहेब घुले उपस्थित होते.


















