लातूर : किल्लारी येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेले आर्थिक व प्रशासकीय प्रयत्न निर्णायक ठरले आहेत. गेली १५ वर्षे बंद असलेला हा कारखाना पुन्हा सुरू करणे हे मोठे आव्हान होते; मात्र केंद्र व राज्य सरकारच्या भक्कम सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक पाठबळामुळे कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक निधी आणि मान्यता मिळाली. या समन्वयातूनच किल्लारी कारखान्याला नवे जीवन मिळाले असून शेतकरी, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. आता या कारखान्याने यंदाच्या हंगामातील गाळपाचा ५० हजाराचा टप्पा गाठला आहे.
निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सोमवारी ही ऐतिहासिक आणि अभिमानास्पद टप्पा पार केला. हा टप्पा म्हणजे केवळ गाळपाचा आकडा नसून, सहकाराच्या ताकदीवर विश्वास ठेवणाऱ्या शेतकरी बांधवांची जिद्द, त्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम आणि सामूहिक प्रयत्नांचे हे जिवंत प्रतीक आहे. पंधरा वर्षे धूळ खात पडलेला हा कारखाना पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने उभा राहताना दिसत आहे असे कारखान्याच्यावतीने सांगण्यात आले. विक्रीस काढलेला आणि पुन्हा सुरू होणार नाही असा शिक्का बसलेला हा कारखाना आज पुन्हा कार्यरत झाला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक उद्योगांना चालना मिळाली आहे. रोजगारनिर्मितीला नवी दिशा प्राप्त झाली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या दूरदृष्टपूर्ण नेतृत्वामुळे, ठाम निर्णयक्षमतेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कारखान्याला नवे जीवन लाभले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व सभासद शेतकरी बांधव, कारखान्याचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि संबंधित सर्व घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

















