सातारा : राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने अतिशय सूक्ष्म नियोजन केल्यामुळेच किसन वीर कारखाना प्रतिदिन ५२०० व खंडाळा सहकारी कारखान्याच्यावतीने ३२०० मेट्रिक टनाने गळीत सुरू आहे. या दोन्ही गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपास येणाऱ्या उसास प्रतिमेट्रिक टन ३ हजार ३५० रुपये दर देण्याचा निर्णय कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेत घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
याबाबत कारखान्याच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दोन्ही कारखाने सुरुवातीपासूनच पूर्ण क्षमतेने गाळप करीत आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला पाठवावा. कारखान्याचे को-जन प्रकल्प, डिस्टिलरी प्रकल्पही सुरू आहे. मागील तीन हंगामामध्ये शेतकरी वर्ग, सप्लायर, तोडणी वाहतूकदारांची सर्व देय्यके दिल्यामुळे सर्वामध्ये कारखान्याप्रती विश्वास निर्माण झालेला आहे. असे यात म्हटले आहे.

















