कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची कमतरता, प्रत्येक ट्रॅक्टरसाठी पाच हजारांहून जास्त खर्च

बेळगाव:ऊसदरठरवण्यास झालेला विलंब, साखर कारखान्यांकडे थकीत बिले यामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला नेण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शेतकऱ्यांना ट्रक किंवा ट्रॅक्टरमधून ऊस वाहून नेण्यासाठी अत्तिरिक्त पाच हजार रुपये खर्च करावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

कारखाने ऊसतोडणीसाठी पैसे देत असले, तरी मजुरांच्या टोळ्या अतिरिक्त पैशांची मागणी करत आहेत. ऊसतोडणी यंत्रांचे मालक आणि कामगार प्रतिटन २५० रुपयांपेक्षा जास्त दराची मागणी करत आहेत. ऊस वाहतूक करण्यासाठी ड्रायव्हरला प्रतिट्रक ५०० रुपये, कापणी यंत्रचालकाला प्रतिदिन ८०० रुपये आणि मालकाला प्रतिटन ३०० रुपये द्यावे लागतात. ऊसतोडणी टोळ्या आणि ट्रॅक्टरमालक प्रतिटन उसासाठी २०० रुपयांपेक्षा जास्त दराची मागणी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस वाहतूक करण्यासाठी ५,००० रुपयांपेक्षा जास्त दर द्यावा लागत आहे.

उत्तर कर्नाटकात कार्यरत असलेले ५४ साखर कारखाने आणि ऊस उत्पादक ऊसतोडणी आणि वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्रातील कामगारांवर अवलंबून आहेत. अशाप्रकारे दरवर्षी ऊस गाळप हंगामात महाराष्ट्रातील किमान १,४०० टोळ्या त्यांच्या कुटुंबांसह बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यांत येत असतात. टोळ्यांना साखर कारखाने आणि ट्रॅक्टर मालकांकडून किमान १०-१५ लाख रुपये आगाऊ मिळत दिले जातात, मात्र काही टोळ्या ऊसतोडणीला न येता फसवणूक करत आहेत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. यंदा ऊसतोडणी एक महिना उशिरा सुरू झाल्यामुळे ऊस वाहतूक आणि काढणी महाग झाली आहे. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आणि इतर कारणांमुळे आग लागलेल्या उसाची तोडणी करण्यास कामगार कचरत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here