महाराष्ट्र : राज्यात ऊस उताऱ्यात कोल्हापूर अव्वल स्थानावर, सरासरी ९.७५ टक्के उतारा

कोल्हापूर : राज्यात १८४ साखर कारखान्यांनी गेल्या दीड महिन्यांत ३ कोटी ६७ लाख ९० हजार टनांचे गाळप केले आहे. सद्यस्थितीत ऊस गाळपात पुणे विभाग पुढे असून, त्यांनी ८६ लाख ७१ हजार टनांचे गाळप केले आहे. मात्र, साखर उताऱ्यात कोल्हापूर विभागच भारी ठरत असून, सरासरी ९.७५ टक्के उतारा सुरुवातीलाच कायम राखला आहे. पुणे विभागात २९ साखर कारखाने आहेत, त्यांनी सर्वाधिक ८६ लाख ७१ हजार टनांचे गाळप केले आहे. त्या तुलनेत कोल्हापूर विभागात ३५ साखर कारखाने असूनही यंदा गाळपात मागे राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ डिसेंबर अखेर एक कोटी ६२ लाख टनाने गाळप अधिक झाले आहे. राज्यात ९१ सहकारी साखर कारखाने असून ९६ खासगी कारखाने आहेत. सरासरी उतारा ८.०३ टक्के आहे.

दरम्यान, राज्यातील ऊस गाळपात बारामती ॲग्रो, पुणे हा कारखाना ९ लाख ४२ हजार मे. टन उसाचे गाळप करून पहिल्या क्रमांकावर आहे. तर दौंड शुगरने ७ लाख ८९ हजार टन गाळप केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कल्लाप्पाण्णा आवाडे, हुपरी कारखाना ५ लाख ८९ हजार मे. टन गाळप करून तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर तात्यासाहेब कोरे, वारणा कारखान्याने ५ लाख ५७ हजार टन गाळप केले आहे. शिरोळच्या दत्त कारखान्याने ४ लाख २५ हजार टन गाळप करून पाचवा क्रमांक कायम ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here