सोलापूर : ऊस दरासाठी मंगळवारी आंदोलनासाठी गेलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या हाती युटोपीयन शुगर कारखाना प्रशासनाने पहिला हप्ता तीन हजार रुपये देण्याचा निर्णय लेखी पत्राद्वारे सुपुर्द केला. हे पत्र हाती पडताच अवघ्या एका तासात भैरवनाथ शुगर कारखान्यानेही उसाला तीन हजार रुपये दर देण्याबाबतचे लेखी पत्र शेतकरी संघटनेकडे दिले. दरम्यान, लोकमंगल कारखाना ऊसदर जाहीर करीत नसल्याने बुधवारपासून सर्वच शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन करतील, असे विविध शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आंदोलकांसमोर जाहीर केले आहे. बीबीदारफळ येथे कारखान्याच्या गव्हाणीत बसून तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलकांसमोर ‘लोकमंगल’च्यावतीने सतीश देशमुख, महेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन पिसे यांनी चर्चा केली. चर्चेत दर जाहीर करण्याची भूमिका सतीश देशमुख यांनी घेतल्याने आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले. प्रभाकर देशमुख, विजय रणदिवे, सचिन पाटील, दीपक भोसले, दीपक पवार, अमोल पाटील, अमोल साठे, पांडुरंग जाधव, प्रफुल्ल कदम, विजय साठे, रोहित पाटील, दीपक कदम, महादेव कदम, तुकाराम साठे, श्रीकांत ननवरे, नीलेश देशमुख, नवनाथ मसलकर, संकेत साखरे आदींसह शेतकरी सहभागी झाले आहेत.
दरम्यान, तीन हजारापेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांची संख्या १९ वर गेली आहे. युटोपियन, भैरवनाथ लवंगी या १ दोन साखर कारखान्यांनी मंगळवारी प्रत्येकी तीन हजारांचा दर जाहीर केला. आता तीन हजार रुपयांपेक्षा अधिक दर देणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या १९ झाली आहे. अठ्ठावीससे व अधिक दर सहा कारखान्यांनी जाहीर केला आहे. अनगर येथील लोकनेते शुगरने २८०० रुपयांप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून पूर्व भागातील ऊस दराची कोंडी फोडली आहे. जिल्ह्यात उसाच्या पहिल्या हप्त्यासाठी आंदोलनाचा भडका उडाला असून, सर्व शेतकरी संघटनांनी एकजूट करत ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे.















