पुणे : यंदाच्या साखर हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी सुमारे ३५ लाख टन साखर वळविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर साखर उद्योगासाठी निश्चित केलेल्या इथेनॉल कोट्यात आणखी वाढ करण्याची आवश्यकता आहे. सध्याचे साखर उत्पादन लक्षात घेता, आणखी पाच लाख टन साखर इथेनॉलकडे वळविल्यास साखर उद्योगाकडून इथेनॉलचा अतिरिक्त कोटा उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे इथेनॉल निर्मितीतील साखर उद्योगाचा सध्याचा टक्का वाढेल, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केले आहे. महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारकडे तशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे.
सद्यस्थितीत गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यामुळे साखर उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. १५ डिसेंबरपर्यंत देशभरातील ४७९ साखर कारखान्यांनी एकूण ७७ लाख ९० हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४७३ कारखान्यांनी ६० लाख ७० हजार टन साखर उत्पादन केले होते. यंदा साखर उत्पादनात १७ लाख २० हजार टनांची, म्हणजेच २८.३४ टक्क्यांची वाढ झाली. उसाच्या गाळपातही १८३.७५ लाख टन वाढ झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १९० साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३७९ लाख टन उसाचे गाळप करून सरासरी ८. २५ टक्के उताऱ्यासह ३१ लाख ३० हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. हे साखर उत्पादन वाढण्याची शक्यता लक्षात घेता साखरेच्या किमान विक्री दर स्थिर राहण्यासाठी केंद्राने साखर निर्यातीच्या कोट्यात आणखी वाढ करावी. त्याचबरोबर आणखी पाच लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवावी.

















