सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून भंडारकवठे येथील लोकमंगल को-जनरेशन अँड इथेनॉल या कारखान्यावर सुरू असलेल्या आंदोलानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसमवेत उसाच्या गव्हाणीत उड्या घेऊन कारखाना बंद करण्यात आला. कारखाना बंद पाडताच प्रशासनाने प्रती टन २,७०० रुपये दराची घोषणा केली. मात्र, ३,००० रुपये अथवा त्यापेक्षा जास्त दराऐवजी एवढा कमी दर जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याच्या संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरूच ठेवले जाईल. तीन हजार रुपये दर मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी घोषणा त्यांनी केले.
‘स्वाभिमानी’ने आठ ते दहा दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यावेळी लोकमंगल कारखान्याच्या प्रशासनाच्या वतीने १६ डिसेंबरला ऊस दर जाहीर करू असे सांगण्यात आले होते. मात्र, ऊस दर जाहीर न केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल, तालुका अध्यक्ष बिळयानी सुंटे, जिल्हा प्रवक्ते इक्बाल मुजावर, माजी बाजार समिती संचालक वसंत पाटील, तालुकाप्रमुख चाँद यादगिरी, तुकाराम शेतसंदी, अब्दुल रजाक मकानदार, बाहुबली, शिवलिंग कारभारी, सिद्धाराम व्हनकवरे, अनिल पाटील, जावेद आवटे आदींनी आंदोलन करत कारखाना बंद पाडला. जोपर्यंत प्रति टन तीन हजार भाव दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र केला जाईल तोपर्यंत आंदोलन सुरूच असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली. कारखाना प्रशासनाने २७०० प्रति टन दर जाहीर केल्याचे परिपत्रक काढले. त्याबद्दल संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.

















