कोल्हापूर: यंदा गुळाचा भाव प्रतिक्विंटल ४२०० रुपये असा झाला असून, दिवसाला तब्बल २०० रुपयांनी वाढ नोंदवली जात आहे. यंदा जेमतेम ८० गुऱ्हाळघरे सुरू असल्याने आवक अगदी कमी आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. कोल्हापुरी गूळ हे जीआय मानांकन प्राप्त उत्पादन आहे. कोल्हापुरी गूळ गोड, दर्जेदार व टिकाऊ असल्याने देशभरातून त्याला मोठी मागणी आहे.
गेल्या पाच वर्षांत गुन्हऱ्हाळघरांना अपुरे मनुष्यबळ, बाजारातील पडलेले भाव आणि गुळात साखर मिश्रण वाढल्याने उत्पादनावर मर्यादा आल्या. गेल्या तीन वर्षात व्यापाऱ्यांनी गुळाला चांगला भाव देण्यास सुरुवात केली. मात्र, याच काळात गुऱ्हाळघरांची संख्या घटल्याने गुळाची आवक कमी राहिली. गूळ उत्पादन वाढावे म्हणून बाजार समितीने कार्यशाळा घेतल्या; परंतु त्यालाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला.
यंदा कोल्हापुरात जेमतेम ८० गुऱ्हाळघरात गूळ उत्पादन सुरू आहे. दिवसाला पाच ते दहा हजार गूळ रव्यांची आवक होते. त्यात गुळात साखर मिश्रण असेल तर त्याला कमी भाव मिळतो; परंतु साखरविरहित शुद्ध गुळाला ४५०० ते ४६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. चांगल्या गुळाला चांगला भाव दिला जात आहे. पुढील काळात गुळाची आवक आणखी वाढेल, अशी शक्यता आहे.
















