सातारा : ऊस तोडणी विलंबामुळे गट कार्यालयाला ठोकले टाळे; संतप्त शेतकऱ्यांचा कोरेगावातील कारखान्यांच्या कार्यालयांवर मोर्चा

सातारा : वारंवार मागणी करूनही सहकारी व खाजगी साखर कारखान्यांकडून कोरेगाव शहर परिसरात ऊस तोडणी वेळेत केली जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगरसेवक हेमंत आनंदराव बर्गे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी शरयू ग्रो इंडस्ट्रीज, शिवनेरी शुगर लिमिटेडचे कार्यालय बंद आढळून आल्याने कार्यालयास टाळे ठोकले. नगरसेवक हेमंत बर्गे यांनी सांगितले की, ऊस तोडणीसंदर्भात १० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले होते. मात्र, आठ दिवस उलटूनही त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येथील शेतकरी जरंडेश्वर शुगर मिल्स, शिवनेरी शुगर लिमिटेड, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर लिमिटेड, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना तसेच शरयू ग्रो इंडस्ट्रीज या कारखान्यांना नियमित ऊस पुरवठा करतात. मात्र, शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी आवश्यक यंत्रणा व टोळ्या वेळेवर दिल्या जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यंत्रणा उशिरा मिळाल्यामुळे उसाला तुरे येणे, ऊस पोकळ होणे यासारख्या समस्या निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. कारखान्यांचे शेती अधिकारी, गट अधिकारी व चिटबॉय हेतूपुरस्पर कोरेगाव शहरासाठी यंत्रणा उपलब्ध करून देत नसल्याचा गंभीर आरोपही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला.

या आंदोलनात हेमंत बर्गे यांच्यासह विलासराव शंकरराव बर्गे, संतोष विलास बर्गे, दीपक हणमंत शिंदे, धवलचंद्र ज्ञानदेव बर्गे, शशिकांत जाधव, गौरव विश्वास बर्गे, सुभाष मलकमिर, दत्तात्रय मलकमीर, रमेश नाळे, भरत बर्गे, जितेंद्र आनंदराव बर्गे, शिवाजी माने, इकबाल मुलाणी, अभिजीत साळुंखे व शिवाजी नाळे व शेतकरी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here