बेळगाव: कर्नाटकातील बहुतांश साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. प्रत्येक साखर कारखान्याने ३१ ते ५४ दिवसांपर्यंत आपला गळीत हंगाम केला आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांचा उसाचा दर महाराष्ट्रापेक्षा तुलनेत ३०० रुपये कमी असल्याने या भागातील शेतकरी महाराष्ट्रातील सीमावर्ती कारखान्यांकड़े आपला ऊस पाठविण्यास इच्छुक आहेत. तरीही गेल्या दीड महिन्यात बेळगाव जिल्ह्यातील २५ साखर कारखान्यांनी ६८ लाख ७३ हजार टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यांची प्रतिदिन २ लाख २ हजार टन ऊस गाळपाची क्षमता आहे. मात्र, गेल्या ३१ ते ५४ दिवसांच्या कालावधीमध्ये ६८ लाख ७३ हजार २८८ टनांहून अधिक उसाचे गाळप झाले आहे.
जिल्ह्यातील उगार शुगर कारखान्याने ३७ दिवसांत ५ लाख ५५ हजार टन तर सतीश शुगर्सने ४ लाख ७७ हजार टन, नणदी चिदानंद कोरे साखर कारखान्याने ४ लाख २८ हजार टन उसाचे गाळप केले आहे. बेडकिहाळच्या व्यंकटेश्वरा कारखान्याने ३८ दिवसांत ४ लाख ८७ हजार टन, जैनापूर येथील ओम शुगरने १ लाख १३ हजार ८१० मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. निपाणीचा हालसिद्धनाथ कारखाना कागवाडचा शिरगुप्पी शुगर्स यांनी दोन ते तीन लाख टन ऊस गाळप केले आहे. रायबाग येथील रेणुका शुगरने १ लाख २० हजार ६९५ टन तर आळगवाही येथील विरेश्वर शुगरने ३ लाख ६३ हजार ४९७ टन ऊस गाळप केले आहे. बेल्लद बागेवाडी येथील विश्वराज कारखाना, संकेश्वरचा हिरण्यकेशी साखर कारखाना, पवाड येथील अथणी शुगर्स, मुनवळ्ळी येथील रेणुका शुगर, कोकटनूर येथील रेणुका शुगर लि., हल्ल्याळ येथील कृष्णा शुगर, कोळवी येथील रेणुका शुगर्स या कारखान्यांचे ऊस गाळपही जोमाने सुरू आहे.















