सातारा : राज्यात एक नोव्हेंबरपासून गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर ४५ दिवसांत सर्वच कारखान्यांनी गाळपावर जोर दिला आहे. यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश येवून सर्वच कारखान्यांनी ३३०० ते ३५०० रूपयांपर्यंत दर देण्याचे जाहीर केले. यानंतर गाळप वेगाने सुरू झाले आहे. सातारा जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा १६ कारखान्यांनी ४०,०७,८४१ टन उसाचे गाळप करून ३५,९४,३७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा सरासरी उतारा हा ८.९७ टक्के राहिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर उतारा दहा टक्क्यांच्या आतच आहे. यातही सहकारी साखर कारखान्यांची कामगिरी चांगली राहिली आहे.
सध्या नऊ सहकारी व सात खासगी कारखान्यांकडून गाळप केले जात आहे. १५ डिसेंबरपर्यंत सहकारी कारखान्यांनी २० लाख २८ हजार २१७ ऊस गाळप करून २१ लाख २९ हजार ५७० क्विंटल साखर उत्पादन घेतले. खासगी कारखान्यांनी १९ लाख ७९ हजार ६२४ टन उसाचे गाळप करून १४ लाख ६४ हजार ८०५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सहकारी कारखान्यांचा उतारा हा १०.५ टक्के तर खासगी कारखान्यांची रिकव्हरी ७.४ टक्के आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गावोगावी वजनकाटे बसवले. त्यामुळे काटामारीला आळा बसणार आहे. शेतकऱ्यांच्या उसाची काटामारी थांबणार आहे. गावातच वजन करून उस कारखान्यात जात असल्याने कारखानदारांना काटामारी करता येत नसल्याचे शेतकरी सांगत आहे.

















