नाशिक : कादवा सहकारी साखर कारखाना कादवा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. शुक्रवार (दि. १९) पर्यंत एक लाख १८ हजार ३५३ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.६३ टक्के मिळाला आहे. यातून एक लाख २५ हजार ७५० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. सध्या कारखान्याचा डिस्टिलरी प्रकल्पही सुरू असून, आतापर्यंत इथेनॉलची आठ लाख ३७ हजार ८४४ लिटर, आर.एस. १३ लाख ७५ हजार ६२७ लिटरची निर्मिती केल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली.
कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाच्या बिलापोटी सुरुवातीला २,५०० रुपये मे. टनप्रमाणे ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग केली होती. आता कारखान्याने फरकाची रक्कम उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. एफआरपीचा पहिला हप्ता २,८०० रुपये प्रति मे. टनप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्याची माहितीही शेटे यांनी दिली.
चेअरमन शेटे यांनी सांगितले की, हंगाम संपल्यानंतर शासन नियमानुसार अंतिम एफआरपी दर ठरणार आहे. वेळेत एफआरपी अदा करत सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कादवा सहकारी साखर कारखाना कायम ठेवणार आहे. सध्या साखर उद्योग बिकट परिस्थितीतून जात असताना कादवा कारखान्याने उत्पादकांना वेळेत एफआरपी देण्याची भूमिका घेतली आहे. कारखान्याने जिल्ह्यात सातत्याने सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा कायम राखली आहे.

















