सोलापूर : सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर कृषी – २०२५ या राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून एक तृतीयांश पाण्याचा वापर करून उसाचे तीन ते चारपट उत्पादन काढण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात येणार आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी ही माहिती दिली. प्रदर्शनात ३०० हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी १० वाजता महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते होणार आहे. शेतकरी बांधवांसाठी ही आधुनिक तंत्रज्ञानाची मोठी पर्वणी असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
अध्यक्ष गुरुराज माळगे, निवृत्त कृषी उपसंचालक विजयकुमार बरबडे, तम्मा मसरे, विलास म्हेत्रे, पशुपती माशाळ यांनी सांगितले की, शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हे प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनात शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या १० मिनिटांत एक एकर क्षेत्रावर फवारणी करणाऱ्या रिमोट ऑपरेटेड ड्रोनचे लाइव्ह प्रात्यक्षिक आयोजित केले आहे. प्रदर्शनात आधुनिक शेती हायड्रोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग आणि सेंद्रिय शेती, तसेच पूरक व्यवसाय दुग्धोत्पादन, रेशीम शेती आणि मधमाशी पालन यांचा समावेश आहे. विशेष आकर्षण जगातील सर्वात लांब १००० केळी असलेला घड आणि १५ इंच लांब गव्हाची लोंबी (कुदरत १००) यांचा समावेश असेल. शासकीय योजना कृषी विभाग व ‘आत्मा’च्या वतीने विविध योजनांची माहिती देणारी स्वतंत्र दालने असतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी जतन केलेले ५०० प्रकारचे दुर्मिळ देशी बी-बियाणे येथे पाहायला व खरेदी करायला मिळणार आहेत. यासोबतच विशेष ‘तांदूळ महोत्सव’ आयोजित केला आहे.

















