परभणी : ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी उसाला ३,००० रुपये उचल आणि ४००० रुपये अंतिम दर द्यावा या मागणीसाठी गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिर ते माखणी येथील जी-७ शुगर्स कारखान्यापर्यंत ऊस उत्पादक संघर्ष दिंडी काढण्यात आली. तसेच, कारखान्याच्या प्रवेशद्वारावर बेमुदत ठिय्या आंदोलनही सुरू करण्यात आले आहे. दर वाढीकरिता ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरली. यानंतर शेतकऱ्यांनी कोयता बंद, वाहतूक बंद आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी अज्ञातांनी आंदोलनकर्त्यांवर कोयत्याने हल्ला केला. परभणी-गंगाखेड मार्गावर घडल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
या संघर्ष दिंडीमध्ये भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन क्षीरसागर, ओंकार पवार, श्रीकांत भोसले, रामेश्वर पौळ, दीपक लिपणे, रामकृष्ण शेरे, शेतकरी संघटनेचे कृष्णा भोसले, विश्वंभर गोरवे, बंडू सोळंके, भगवान शिंदे, सुधीर बिंदू, सुभाष कदम आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजय बुरांडे यांनी सांगितले की, जी-७ साखर कारखाना प्रशासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीबाबत उदासीनता दाखवली आहे. त्यामुळे प्रशासनासोबत ऊस दराबाबतची बोलणी फिसकटली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे संघर्ष दिंडी काढण्यात आली. आता कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. हा प्रश्न न सुटल्यास शेतकरी गव्हाणीत देखील उतरतील.

















