अहिल्यानगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अलिकडेच देशाचे सहकारमंत्री, गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशातील पहिल्या बायो सीएनजी व पोटॅश ग्रॅन्युएल खत निर्मीती प्रकल्पाचे लोकार्पण करून सहकार क्षेत्रात नाविन्यपुर्ण कामगिरी करत आपल्या कल्पक नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली होती. त्याची दखल घेत कारखान्याला सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबददल राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पुणे येथे राज्यस्तरीय ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कारखान्याच्या वतीने हा पुरस्कार माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना समर्पित करण्यात आला. कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी संचालक मंडळासह व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या वतीने कारखान्याचे संचालक रमेश आभाळे व ज्ञानेदव औताडे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, सहकार आयुक्त दिपक तावरे, कॉसमॉस बँक बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष मिलींद काळे, बँकेचे अध्यक्ष अॅड प्रल्हाद कोकरे, गौतम ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल उपस्थित होते.

















