सातारा : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने (व्हीएसआय) ऊस व साखरेची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे व त्याचा शेतीत प्रत्यक्ष वापर होण्यासाठी गेल्या ३४ वर्षांपासून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो. या प्रशिक्षणाला सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यातर्फे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना या प्रशिक्षणासाठी पाठवण्याची परंपरा आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सभासद-शेतकरी प्रशिक्षणाला रवाना झाले. या प्रशिक्षणार्थी सभासदांना कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
ज्ञानयाग प्रशिक्षण कार्यशाळेसाठी कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना रवाना करताना रमेश चव्हाण, जयेंद्र नाईक, वसंतराव चव्हाण, संजय चव्हाण, जी. व्ही. पिसाळ, भास्कर कुंभार आदी उपस्थित होते. दरवर्षी प्रतिवर्षी सह्याद्री कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक सभासदांना ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी पाठवण्यात येते. या कार्यक्रमात व्हीएसआयचे शास्त्रज्ञ शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करतात. त्याचा लाभ अधिकाधिक सभासदांना होईल असे सह्याद्री कारखान्याच्यावतीने सांगण्यात आले.
















