अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. लि. या साखर कारखान्याने आतापर्यंत ३ लाख २५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. याबाबत ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी माहिती दिली. शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विश्वास, कारखान्याचे कुशल व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक परिश्रम यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचेही बोत्रे-पाटील यांनी नमूद केले.
ते म्हणाले, ओंकार ग्रुपच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. बाजारभावाच्या बाबतीतही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रुपने आघाडी घेतली आहे. या कामगिरीच्या जोरावर आगामी काळात महाराष्ट्रात ओंकार ग्रुप एक नंबरचा ऊस गाळप करणारा समूह ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत ऊस उत्पादकांना योग्य दर, वेळेवर पेमेंट आणि पारदर्शक कारभार दिल्यामुळेअहिल्यानगर शेतकऱ्यांचा कारखान्यावरचा विश्वास वाढत आहे. बंद पडलेल्या कारखान्यांना उभारी मिळाल्याने ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळाली आहे.
गौरी शुगरचे व्यवस्थापक रोहिदास यादव म्हणाले, की शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला ऊस वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने गाळपासाठी स्वीकारण्यात आला. ऊस वाहतूक, गाळप आणि पेमेंट या सर्व बाबींमध्ये शिस्त पाळण्यात आल्याने कारखान्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गाळप वाढवणे, शेतकऱ्यांना योग्य दर देणे व परिसराच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी ओंकार ग्रुप कटिबद्ध राहील, असेही त्यांनी सांगितले.

















