पुणे : पुणे जिल्ह्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम गतीने सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील अठरापैकी ‘घोडगंगा’, ‘राजगड’ आणि ‘यशवंत’ हे तीन कारखाने बंद आहेत. तर पंधरा कारखान्यांकडून आतापर्यंत जिल्ह्यात ५३ लाख ५७ हजार टन उसाचे गाळप केले आहे. ४६ लाख ३४ हजार क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. तीन कारखाने बंद असले तरीही ऊस कमीच पडत आहे. सभासदांचा व नोंद केलेला ऊस गाळप करतानाच अन्य कार्यक्षेत्रातील गेटकेन आणण्यासाठी कारखान्यांमध्ये अहमहमिका चालली आहे. विशेषतः दौंड तालुक्यातील उसाच्या आगारावर सगळे तुटून पडल्याचे दिसून येत आहे. गाळपात बारामती अॅग्रोने १० लाख टनांचा तर दीड शुगरने ९ लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. ५ खासगी कारखान्यांनी ८ सहकारी कारखान्यपिक्षा अधिकचे गाळप केले आहे.
गत हंगामापेक्षा साखर उतारा अर्ध्या टक्क्यांनी अधिक आहे. उताऱ्यात ‘सोमेश्वर ‘ने अन्य कारखान्यांना खूप मागे टाकले आहे. माळेगाव, विघ्नहर, छत्रपती व भीमाशंकर या सहकारी कारखान्यांचे उतारे अत्यंत समाधानकारक आहेत. तर गाळपात अवघ्या पन्नास दिवसांत ‘बारामती अॅग्रो ‘ने तब्बल १० लाख टनांचा तर ‘दौंड शुगर’ने नऊ लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. तेरा कारखान्यांनी २९ नोव्हेंबरपर्यंत ५३ लाख ५७ हजार ६४७ टनांचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ८.६५ टक्के इतका आहे, गवहंगामात तो याच दिवसात ८.१६ टक्के इतका होता. जिल्ह्यातील आठ सहकारी कारखान्यांचा उतारा तब्बल ९.८९ टक्के इतका समाधानकारक आहे. तर पाच खासगी कारखान्यांचा ७.४७ टक्के इतका आहे.

















